नीलम गोर्‍हे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव फेटाळला   

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आणलेला अविश्वास ठराव सभापती राम शिंदे यांनी मंगळवारी फेटाळून लावला. शिवसेनेचे अनिल परब यांनी यावर चर्चेची मागणी लावून धरली. विरोधकांनीही चर्चेची मागणी करत गदारोळ केला. मात्र, सभापतींनी चर्चेची मागणीही फेटाळून लावली.
 
राज्य विधिमंडळाच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर ५ मार्च रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती गोर्‍हे यांच्या विरोधात दहापेक्षा अधिक सदस्यांची स्वाक्षरी घेऊन अविश्वास ठराव विधिमंडळ सचिवांकडे सादर केला होता. या ठरावावर सभापती शिंदे यांनी त्यांचे निवेदन सादर केले.
 
ठराव चर्चेला आणण्यापूर्वी १४ दिवस आधी तो दाखल करावा लागतो. त्यांनतर ठराव दाखल करणार्‍या १० सदस्यांच्या उपस्थितीत त्यावर चर्चा करायची असते. विधिमंडळाच्या नियमात हा ठराव बसत होता. त्यामुळे विरोधकांची यावर चर्चेची मागणी होती. मात्र, विरोधकांच्या सूचनेत स्पष्टता नाही. त्यामुळे विरोधकांची ही सूचना विचारात घेता येणार नाही, असे म्हणत सभापती शिंदे यांनी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला.
 

Related Articles